एकतेचे महत्व
गार्गी वैद्य [८ ब]
‘एकतेमध्ये खूप ताकद असते’ हे विधान खूप प्रसिद्ध आहे. हे अगदी खरं आहे, असं मला वाटतं. माणूस जे एकटा करू शकत नाही ते अनेक माणसं एकत्र मिळून करणे संभव आहे. आपल्या भारत देशाचं उदाहरण घेतलं तर आपण बघू शकतो की जेव्हा एक-दोन माणसांनी स्वातंत्र्यासाठी त्यांचा आवाज उठवला, तर त्याचा काहीच परिणाम झाला नाही; पण जेव्हा संपूर्ण देश मिळून लढायचा निर्णय घेतला तेव्हा मात्र आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे काम एकटे करणे अशक्य होते; पण सर्वांनी जेव्हा एकत्र प्रयत्न केला तेव्हा मात्र काम सहजासहजी पार पडलं. म्हणूनच आज सुद्धा आपल्या भारत देशात सर्व धर्म व जाती शांतपणे एकमेकांसोबत एकत्रपणे आनंदाने राहत आहेत. हे एकतेमुळे. दुसऱ्या देशात सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. हे सिद्ध झालं आहे की एकतेमध्ये खूप ताकद असते म्हणून आता आपण सर्व कसे एकमेकांसोबत एकतेने राहत आहोत असेच नेहमी राहिले पाहिजे.
आमची वर्षा मावशी
मीरा गाडगीळ [८ ब]
मी आठ वर्षापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकत आहे. माझ्या गुरु म्हणजेच श्रीमती वर्षा भावे या माझ्या आदर्श आहेत. आम्ही त्यांना लाडाने ‘वर्षा मावशी’ म्हणतो. मला त्यांच्या विषयी खूप आपुलकी आहे त्या उत्तम गातातच पण उत्तम लिहितात सुद्धा, छान नृत्य करतात, अभिनय करतात आणि सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवतात. त्यांनी आम्हा मुलांना अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला आणि नाटकात काम करण्याची संधी दिलेल्या आहेत. त्या आम्हाला फक्त गायला शिकवत नाही; तर जगायचे कसे, गोड कसे बोलायचे, आपली भारतीय संस्कृती हे सगळं शिकवतात. वर्षा मावशींनी आमच्यावर चांगले संस्कार केले आहेत.
आमची वर्षा मावशी माझी मैत्रीण, गुरु आणि माझे आदर्श.
माझी आजी
श्रीया आठल्ये [८ स]
पांढऱ्या केसांची ती देवासमोर बसलेली वृद्धा म्हणजे माझी आजी होय. आजी-आजोबा खरंच एक देवाची देणगी आहे. माझ्या आजीचे नाव धनश्री होते. माझा जन्म झाल्यावर चार वर्षानंतर मला एक भाऊ झाला माझ्या आई-बाबांना मात्र माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, तेव्हा माझी आजीच माझी आई झाली हो. तिने माझ्यात तिची मुलगी पाहिली असेल. तिने माझ्या खाण्यापिण्यात कधीच काही तुटवडा पडू दिला नाही आणि तिचे बेसनाचे लाडू म्हणजे, वाहवा ! अगदी सुगरण होती हो माझी आजी. वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा तिने आपल्या शरीराची खूप चांगली काळजी घेतली होती. तिला तर पोळी भाजी आमटी आणि भात च्या ऐवजी काही चालायचे नाही. माझ्या आजीला वाचनाची खूप आवड होती. तिने मला वाचनाचे महत्त्व समजावले आणि मला सारे संस्कृत श्लोकही शिकवले.
तर अशी होती हो आजी माझी. एक दिवस कोरोना आला आणि माझ्या आजीला देवा घरी घेऊन गेला. आजी, मला तुझी खुप आठवण येते आणि हा लेख लिहिताना माझ्या सगळ्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.
माझा पहिला 'मेट्रो ट्रेन' प्रवास
आरूष कुलकर्णी [८ ड]
मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाल्यापासून मला मेट्रो ट्रेन मधून फिरायची खूप इच्छा होती. तसे मी आई-बाबांबरोबर बस, लोकल ट्रेनमधून फिरलो आहे, पण नवीन दिसणाऱ्या मेट्रोची काही वेगळीच मजा आहे. एके रविवारी आम्ही सर्वांनी मेट्रो ट्रेन सफर करण्याचा निश्चय केला. मी तर खूपच आनंदात होतो. सकाळी लवकर निघून आम्ही अंधेरी मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. स्टेशन्स अगदी स्वच्छ व सुंदर बनवली आहेत. टोकन घेऊन आम्ही ट्रेनच्या दिशेने गेलो. बरेच लोक उत्साहाने मेट्रो ट्रेनचा प्रवास करण्यासाठी थांबले होते. काही जण आपल्या कुटुंबासोबत तर काहीजण मित्र-मैत्रिणीबरोबर थांबले होते. उत्साहाने फोटो काढत होते. काही क्षणातच ट्रेन मोठ्या दिमाखात स्टेशनवर आली. मेट्रो ट्रेन हळूहळू थांबली आणि बंद असलेले दरवाजे हळूहळू उघडले. आम्ही सर्व प्रवासी आत जाऊन बसलो. सुट्टीचा दिवस असल्याने जास्त गर्दी नव्हती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. एसीमुळे थंडगार वाटत होते. मी उत्साहात खिडकीजवळ बसून बाहेर पाहू लागलो. ट्रेन आपल्याच दिमाखात पळत होती. एकेक स्टेशन पुढे जात होती.. बाबा मला येणाऱ्या स्टेशनची माहिती देत होते. मेट्रोचा हा प्रवास असाच लांब पर्यंत सुरू राहावा असे मला वाटत होते, पण काही वेळात शेवटचे स्टेशन आले आणि आम्हाला उतरावे लागले. हा प्रवास माझ्यासाठी वेगळा सुखद अनुभव देणारा होता.. ही माझी पहिली मेट्रो सफर मला नेहमी अविस्मरणीय राहील.
प्राणी संग्रहालय
त्विषा प्रभू [८ ड]
काल मी आणि माझे कुटुंब प्राणी संग्रहालयात गेलो होतो. आत गेल्यावर एका बाईने आमचे तिकीट बघून आम्हाला सापाच्या विभागात पाठवले. तिथे मोठमोठे रंगीत व वेगवेगळ्या आकारांचे साप होते. त्या नंतर आम्ही सिंहाच्या विभागात गेलो. तिथे आम्ही मोठे सिंह बघून खूप घाबरलो. तेव्हा समजले की सिंहाला ‘जंगलाचा राजा’ का म्हणतात. मग आम्ही माकड विभागात गेलो तिथे लिहिले होते ‘छोटे सामान सांभाळा.’ माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत होते. केळी खाऊन त्यांच्या साली लोकांवर फेकत होते. मग आम्ही हत्तीच्या विभागात गेलो. हत्ती त्याच्या पिल्लांना पाणी देत होते.
आत आम्ही वाघाच्या विभागात गेलो. वाघाच्या विभागात पोहचल्यावर फार वाईट वाटले. कारण तिथे फक्त एकच वाघ होता. मी तेथील काही माणसांना वाघाबद्दल विचारले. ते म्हणाले, “वाघाचे शरीर खूप किमती असल्यामुळे काही लोक त्याची शिकार करतात.” आता त्याची संख्या खूपच कमी झाली आहे.आम्ही फार दुःखी झालो की भारताच्या राष्ट्रीय प्राण्याची आपण शिकार करतो. आपण सर्वांनी प्राण्यांची रक्षा केली पाहिजे.
सहल
श्रीया नवार [८ ड]
‘सहल’ हा शब्द ऐकताच मनामध्ये उत्साह मजा, मस्ती आणि मित्रमंडळी या सगळ्यांचे विचार सत्र सुरू होते. दरवर्षीप्रमाणे जशी सहलीची नोटीस आली तशी आम्ही आमच्या सहलीबाबत एकेक नवीन बेत आखायला सुरुवात केली. प्रथमच आम्ही दोन दिवस आई-बाबांशिवाय बाहेरच्या ठिकाणी राहायला जाणार होतो. यावर्षी आम्ही शाळेमधून ‘लोणावळ्याला’ सहलीला गेलो होतो सकाळी लवकर शाळेतून बसने निघालो. दुपारी आम्ही डेला पार्कला पोहोचले. तिथे आम्ही अनेक साहसी खेळ खेळलो जसे झिपलाईन , डोंगरावरून खाली उतरणे आदि . दुपारच्या जेवणानंतर आमच्या मनोरंजनासाठी लाईव्ह गाण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मला माझ्या शिक्षकांनी प्रोत्साहन केले. मी तिथे एका गायकासोबत एक हिंदी गाणे म्हटले. त्याच्यासोबत गाण्याचा अनुभव खूप छान होता गाणे संपल्यावर सगळ्या शिक्षकांनी माझे खूप कौतुक केले. नंतर आम्ही हॉटेलमधील आमच्या रूमवर गेलो. थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा आम्हाला खाली बोलावले. तेव्हा आम्हाला सरप्राईज पार्टीबद्दल सांगितले. खूप मजा मस्ती केली नंतर शिक्षकांनी आम्हाला रूममध्ये झोपायला सांगितले पण झोप कोणाला येणार होती? आम्ही रूममध्ये जाऊन पुन्हा एकदा गप्पा मारायला सुरुवात केली पण नंतर कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी जेव्हा आमचे शिक्षक उठवायला आले तेव्हा खडबडून जागे झालो. लगेच तयारी केली आणि तसेच रूममधून निघालो. नंतर आम्ही नॅब सेंटरला गेलो तिथे आम्ही आंधळे लोक कसे काम करतात आणि कसे पैसे कमवतात ते सगळं बघून मला खूप नवल वाटले आपल्याकडे जी दृष्टी देवाने दिली आहे ती त्यांच्याकडे नसून सुद्धा ती किती कष्ट करून पैसे कमवतात तिकडून आम्ही वॅक्स वस्तूसंग्रहालय येथे गेलो . तिकडे 90 पेक्षा जास्त मेणाचे पुतळे होते. त्याच्यामध्ये विशेष पुतळा म्हणजे’ श्री बाळासाहेब ठाकरे’, ‘ छत्रपती शिवाजी महाराज’ हिटलर आणि राणी एलिझाबेथ यांचे होते. शाळेत पुन्हा आल्यावर सगळ्यांच्या मनात फक्त हा एक विचार येतो की आता सहल संपली आणि आता मज्जा मस्ती बंद आणि अभ्यास चालू पण सहलीला जाऊन आल्यावर एक कळलं की सहली किती महत्त्वाच्या असतात. सहलीमुळे बाहेरच्या जगाशी ओळख होते. बाहेरच्या जगात कसे वागायचं हे कळतं. त्यामुळे दरवर्षी सहलीला गेलेच पाहिजे.
Commentaires