एक अविस्मरणीय यात्रा
रिया विन्हेरकर [ ७ ब ]
३ मार्च, 2020 ला मी व माझा सह-परिवार एका यात्रेला गेलो होतो. ती यात्रा ‘मंडनगड’ माझ्या गावात होती. मी, आई, बाबा, काका, काकी, आजी-आजोबा, व माझा दादा, आम्ही सगळे एकत्र गेलो होतो. पाच तासाचा रस्ता असल्याने आम्ही पहाटे निघालो,
मी या आधी, कधीच एक गाव बघितले नव्हते. मला या यात्रेमुळे खूप आनंद झाला. माझे गाव खूप सुंदर आहे. तिथे खूप झाडेसुद्धा आहे. आम्ही सर्व आमच्या गावातल्या घरात राहत होतो. सर्व खूप नवीन होतं. आमचे स्वतःचे एक खूप मोठे शेतसुद्धा आहे. दुपारी, माझ्या आजीने आमच्यासाठी चमचमीत जेवण बनवले. आम्ही सर्वांनी पोट भरून खाल्ले. सायंकाळी मी, माझा दादा व माझे बाबा आणि काका आम्ही मिळून शेती केली. आमच्याकडे एक गाय व दोन बैल सुद्धा आहेत . मी कधीच शेती न केल्याने मला खूप मजा येत होती.
रात्री आम्ही सर्वजण खेळ खेळत होतो. खूप मजा आणि धमाल केली आम्ही. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही जेवण करून निघालो. ही एक खूप अविस्मरणीय यात्रा होती.
मोर
इलिशा पंजाबी [७ ड]
जगात निरनिराळे पक्षी आहेत जसे की मोर, पोपट, कावळा, गिधाड , चिमणी, माळढोक, कबुतर इत्यादी. पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हवेत उडणे. त्यांचे शरीर हलके असल्यामुळे ते उडू शकतात. पक्ष्यांना उडताना पाहून मनुष्याने विमान बनवले.
मी जर पक्षी झाले तर मला मोर बनायला आवडेल. मोर हे खूपच सुंदर पक्षी आहेत. मी माझ्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करेन. आकाशात काळे ढग बघून माझा पिसारा फुलवून नाचेन. माझे पीस भगवान श्री कृष्णाच्या मस्तकावरील मुकुटात लावले जातात. शेतातील उंदीर खाऊन मी शेतकर्याची मदत करेन.
साधारण मनुष्य असो, राजा असो की देव – सर्वांना माझे सौंदर्य आवडते म्हणूनच भारत सरकारने मोराला देशाचा ‘राष्ट्रीय पक्षी’ घोषित केले आहे.
पक्ष्यांकडून आपण शिकतो की काही ही संग्रह करू नये. उच्च लक्ष्य ठेवावे आणि आनंदाने जगावे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – एक युगपुरुष
श्रीया आठल्ये [७ ड]
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हे अजरामर वाक्य म्हणणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे आपल्या सर्वांना परिचित आहेत. या महापुरुषाचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. माझे भाग्य म्हणून नाताळच्या सुट्टीमध्ये आम्ही त्यांचे जन्मस्थान पाहून आलो. लहानपणापासूनच त्यांनी कसरतीचे महत्व जाणले. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांना अन्यायाचा खूप राग होता. म्हणूनच त्यांनी ‘केसरी’ या वर्तमानपत्रातून जनजागृती केली. ‘केसरी’ हे खूप लोकप्रिय वर्तमानपत्र होते. या वर्तमानपत्रातून त्यांनी आपली मते व विचार लोकांसमोर मांडले. इंग्रज सरकारला त्यांची धास्ती वाटत असे. यामुळेच त्यांनी टिळकांवर खटला भरला. त्यांना मंडालेच्या तुरुंगात टाकले. त्या तुरुंगात त्यांनी ‘गीतारहस्य’ हे पुस्तक लिहिले. सर्व लोक एकत्र यावीत म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरूवात केली. अशा या तेजस्वी युगपुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम.
सणाचे महत्त्व
आहाना खोत [७ इ]
सण हे भारतीय संस्कृतीचा मुख्य भाग आहे. ते आपली संस्कृती जपतात. सण साजरा करून लोकांना खूप आनंद मिळतो. महिला, पुरूष, लहान व मोठे सर्व भेदभाव विसरुन एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात. सणाच्या आधी लोक घरे, परिसर, साफ करतात. रांगोळ्या काढतात, फुले लावतात, दिवे लावतात. वातावरण प्रसन्न होते. सणाला, घरी गोड पदार्थ तसेच पारंपारीक पदार्थ बनवतात, पारंपारीक कपडे घालतात व परंपरा जपतात. मित्र मंडळी, नातेवाइक भेटतात म्हणून सर्व परिवार, समाज भाडंणे विसरून एकत्रीत येतात आणि सर्वाना शुभेच्छा देतात. काही सण राष्ट्रीय असतात. त्यात सर्व देश, जात, धर्म, विसरून सण साजरा करतात. काही सण महिलांसाठी असतात. महिला नाच-गाणी करत एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करतात. काही सण निसर्गाला जोडले असतात म्हणून निसर्गाचे रक्षण होते. जनावरांची पण काळजी घेतली जाते. काही सण पुराणावर आधारित असतात. त्यात जुन्या परंपरा पाळल्या जातात व पुढच्या पिढीला त्या परंपरा समजतात. काही सण ऐतिहासिक असतात. सर्व समाज एकत्र येऊन सण साजरा करतात व वीर पुरुषाची त्यांच्या शूरपणाची आठवण करतात व पुढील पिढीला ते समजते. सणात घरी नवीन वस्तूंची खरेदी होते. सगळ्यांना प्रेमाने भेटवस्तू दिल्या जातात. गरीब लोकांना मिठाई व भेटवस्तू मिळतात. अश्याप्रकारे सण लोकाना व समाजाला प्रेमाने एकत्र येऊन एकमेकाना मदत करण्याची भावना निर्माण करतात. सगळ्यांचे नातेसंबंध घट्ट करतात . अश्याप्रकारे सण आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण आहेत.
मी पक्षी झालो तर …
राघव कनोडिया [७ इ]
एकदा एक पक्षी पाहत असताना माझ्या मनात आले , ‘खरंच मी पक्षी झालो तर…’ मला सुंदर पंख मिळतील, माझा रंग आकर्षक असेल आणि माझं अंग मऊ असेल. माझे सुंदर पंख पसरवून मी शांतपणे आकाशात विहार करेन. हजारो किलोमीटरचा प्रवास करेन आणि विविध देशांना भेटी देईल. इतर देशात जायला मला पासपोर्ट नको किंवा व्हिसा पण नको. निसर्गातील फुलांचे, फळांचे सौंदर्य डोळे भरून पाहीन. झाडाच्या उंच फांदीवर बसून नैसर्गिक सौंदर्य पाहीन. मी माझे सुंदर घरटे कोणत्याही झाडावर बांधेन. जर मी पक्षी झालो तर मी डोंगराच्या शिखरावर बसून मधुर आवाजात गाणे गाईन. मी मनानुसार फळे आणि धान्ये खाणार. मी नदीच्या थंड पाण्यात आंघोळ करून खूप मजा करणार. मी इतर पक्ष्यांशी मैत्री करून राहील आणि माझे अनेक साथीदार असतील. खरंच जर मी पक्षी असतो तर ते खूप चांगले झाले असते.
माझे कुटुंब
अल्सिना [७ फ]
कुटुंब असेल जिथे,
हसणे-रडणे असते तिथे,
एकोपा-भांडण असेल जिथे,
त्यालाच अनोखे घर म्हटले जाते.
जिथे सगळे काम करतात,
कायम एकत्र राहतात,
जिथे प्रेमाचे वातावरण सगळ्यांना गहिवरते,
त्यालाच तर अनोखे घर म्हणतात.
चार भिंतीच्या आत राहतात,
एकमेकांना सुख-दु:ख वाटून घेतात,
जे सुंदर सजवलेले जातात,
त्यालाच अनोखे घर म्हणतात.
कधी-कधी कुठे भांडण होतो,
दुसर्या क्षणालाही सावध होतो,
जिथे कोणी एकमेकांचा हात सोडत नाही,
त्यालाच तर अनोखे घर म्हटले जाते .
एक रम्य सकाळ
श्रीया नवार [ ७ फ]
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मी डिसेंबर महिन्यात माझ्या कुटुंबाबरोबर सहलीला गेले होते. यावेळी आम्ही मालवण येथील ‘तोंडवळी’ या समुद्र किनाऱ्यावर गेलो. आमचे रिसॉर्टचे घर अगदी समुद्राजवळ होते. तेथील रूमच्या खिडकीतून समुद्राचे सकाळी दर्शन होत होते. पहिल्या दिवशी मला पहाटेच टकटक आवाजाने जाग आली. त्या आवाजाच्या दिशेने मी शोध घेतला तर एक सुतार पक्षी आमच्या खिडकीच्या काचेवर टकटक करत होता. तो इतका जवळ होता कि, मी त्याचा मोबाईल मधून फोटो सुद्धा काढला.
मी हळूच रूमच्या बाहेर आली. अजूनही सगळीकडे अंधार होता. झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. त्या घराबाहेर अनेक फुलांची झाडे होती. फुलांचा मंद सुवास वातावरणात दरवळत होता. सूर्य हळू हळू वर येऊ लागला, सूर्याची तांबूस सोनेरी किरणे पसरू लागली. समुद्र किनाऱ्यावर मी फिरायला गेले होते. किनाऱ्यावरील वाळू अगदी थंडगार होती. त्या थंडगार आणि मऊशार वाळूत फिरताना खूप मस्त वाटत होते. दुरून एक होडी किनाऱ्यावर येताना दिसली. त्या होडीमध्ये मासेमारी करण्याकरिता गेलेले कोळी होते. ते त्यांचे गाणे गात होते आणि थोड्यावेळाने ते किनाऱ्यावर आले. मग ते जाळ्यातील पकडलेले मासे वेगळे करु लागले. हे सर्व करत असताना ते त्यांची गाणी गात होते. त्या तालावर ते आपली कामे पटापट करत होते. मी ते दुरूनच बघत होते .
आता सूर्य चांगलाच वर आला होता. एकेक जण उठून आता रूमच्या बाहेर येऊ लागले. तेवढ्यात आईने मला बोलावले. मग मी रूमकडे परत गेले. खरोखर मी अनुभवलेली ही रम्य सकाळ नेहमीच माझ्या लक्षात राहील.
Comments