माझ्या आईची पर्स
सीया गुरव [६ ड]
आईची पर्स एका जादूगारापेक्षा कमी नाही आहे, जादूगाराच्या खिश्यातून काय निघेल ते सांगता येत नाही, कधी साप, कधी ससा अशा अचंबित करणार्या गोष्टी. एकदा मला चॉकलेट खाण्याची इच्छा झाली, तेव्हा मी आईकडून काहीतरी गोड मागितले, तिने तिच्या पर्समध्ये शोधायला सांगितले आणि आश्चर्याने मला एक कॅडबरी सापडली !
पर्समध्ये खूप पैसे होते त्याच्याबरोबर ए. टी. एम. कार्ड आणि ओळख पुरावे होते. सगळ्या महिलांसाठी लिपस्टिक, पावडर ह्या वस्तू अनिवार्य असतात. आईच्या पर्स मध्येसुद्धा मला हे सापडले. कधी, कुठे जाताना माझे केस नीट नसले तरी ते नीट करण्यासाठी तिच्याजवळ फणी नेहमी असते. कधी मला इजा झाली, तर त्यावर लावण्यासाठी बॅंडेड पर्समध्ये असतेच. माझ्या बहिणीमुळे, तसेच माझ्यामुळे आईचे डोके दुखले तर त्याकरिता बाम असतोच. आजच्या जगात आई चार्जर घेऊन फिरते, चावीचा भरगच्च गुच्छा ही असतोच. कोणती चावी कुठल्या दरवाज्याची आहे हे तिलाच माहीत असते.
अशाप्रकारे आईची पर्स ही एका जादूगाराच्या खिशाप्रमाणे असते. त्यात गरजेच्या वस्तू सापडण्याची शक्यता अधिक असते. पण काही घेण्यापूर्वी आईला विचारले नाही तर आपण संकटात सापडू शकतो.
खोडरबर
जिया गुरव [६ ड]
चुका कोणालाच आवडत नाही, जरी त्या एका विद्यार्थ्याच्या वहीतील असू दे आणि त्यासाठीच माझा शोध लागला. 'शोधावरून' आठवले की जर तुम्हाला मला शोधायचे असेल तर मी एका कोपर्यात पडलेला असेन,पण कधी एका विद्यार्थ्याच्या पेन्सिल बॉक्समध्ये नाही दिसणार.
लहान मुलं मला पेन्सिल आणि पेनने मारतात. माझे रंग वेग-वेगळे असतात आणि मी आकर्षित असतो. पण दोन-तीन दिवस माझ्याकडे लक्ष न दिल्यामुळे तसेच इकडे-तिकडे पडल्यामुळे माझे अंग काळे काळे होते. म्हणून तुम्ही माझी एखाद्या भूकंपग्रस्त माणसाबरोबर तुलना करू शकतात. जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा मुलं माझ्यात छिद्र करतात आणि हातोडी सारखा उपयोग करतात.
अशा प्रकारच्या वेदना सहन करूनही मला एका गोष्टीचा आनंद होतो की मुलांना चुका सुधारण्याची संधी देतो. मोठे झाल्यावर चुका सुधारण्याची संधी फार कमी मिळते.
जर मी पक्षी असते तर…
दिप्ता एडवणकर [६ ड]
संध्याकाळी मी आकाशात लांब रांगेत उडणारे पक्षी पाहिले आणि माझ्या मनात विचार आला, जर मी पक्षी असते तर?
जर मी पक्षी असते तर मी माझे आयुष्य स्वतंत्रपणे जगले असते. आकाशात स्वच्छंदपणे उडले असते. संपूर्ण जग फिरले असते. पर्वत, जंगलांवर मनसोक्त प्रवास केला असता. समुद्र आणि नदीच्या पाण्यात खेळले असते. झाडांवरची मधुर फळे चाखली असती. निसर्गाचा खूप खूप आनंद घेतला असता. मी ज्या झाडावर घरटे बांधले ते झाड मनुष्य तोडून टाकेल ही मनात भीती असतानाही मी इतर पक्षांसोबत मिळून झाडांवर सुबक घरटे बांधले असते व आनंदाने गाणे गायले असते. मला रोज सकाळी पुस्तकांनी भरलेली बॅग घेऊन शाळेत जावे लागले नसते व रोज अभ्यासही करावा लागला नसता. मी कधीही कुठेही जाऊ शकले असते. उडता उडता थकले तर कुठल्याही झाडावर आराम केला असता. मी स्वतंत्रपणे उडत जगभर फिरत जगाविषयी ज्ञान मिळवले असते.
माझा आवडता सण - दिवाळी
दुर्गा पाटील [६ फ]
भारतात अनेक सण साजरे केले जातात . त्यातील माझा आवडता सण दिवाळी आहे.
दिवाळीला ‘दीपावली’ असे ही म्हणतात. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. त्यामध्ये आपण धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन, भाऊबीज आणि बलिप्रतिपदा असे पाच दिवस साजरे करतो. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. दिवाळीला दिवे, पणत्या आणि आकाशकंदील लावले जातात. बाबा दाराला तोरण लावतात. मी दारापुढे रांगोळी काढते व घर पणत्यांनी सजवते.
आई गोड व चटकदार फराळ जसे लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी इत्यादी पदार्थ बनवते. दिवाळीचा सण प्रेम व आनंद वाढवणारा आहे.
दिवाळीत शाळेला सुट्टी, अभ्यासाला बुट्टी !
मौज - मज्जा, मस्ती यांनी वातावरण भरलेले असते. म्हणून हा सण मला खूप आवडतो.
コメント