माझे स्वप्न
देविका पिंगे [५ ड]
मी टेनिस कोर्टवर जाते तेव्हा माझे कोच गमतीने, आमची मार्टिना हिंगिस आली असं म्हणतात.... कधी खेळताना माझ्याकडून चुका होत असतील तर चिडून, 'मार्टिनाने तुझा खेळ बघितला तर तिला किती वाईट वाटेल' असंही म्हणतात.. त्यामुळे मार्टिना हिंगीसबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता होती. २०१७ मध्ये मी जेव्हा खेळायला सुरुवात केली त्याच वर्षी ती खेळातून निवृत्त झाली. त्यामुळे तिचा खेळ मी तसा कधी बघितला नव्हता.
मग एकदा एका सुट्टीच्या दिवशी मी गुगलवर मार्टिना हिंगीस टाईप केलं आणि सविस्तर माहिती वाचली आणि ती वाचत असताना मी तिच्या प्रेमातच पडले.
जगज्जेते पद मिळवणारी सगळ्यात लहान वयाची टेनिसपटू. जेव्हा तिने पहिली जागतिक स्पर्धा जिंकली तेव्हा तिचे वय फक्त बारा वर्ष होतं, हे वाचून मी भारावून गेले आणि मग यु-ट्युब वर तिच्या मिळतील तितक्या मॅच पाहायचा सपाटाच लावला. तिची स्टाईल, जिंकण्यासाठीची धडपड, यशामागची मेहनत, समोर आलेल्या अडचणी, चेहऱ्यावरचं हसू आणि निश्चय हा सगळा प्रवास खूप जादुई आणि माझ्यासारख्या खेळाडूला शिकवणारा होता.
मार्टिना वयाच्या दुसऱ्या वर्षापासून टेनिस खेळू लागली आणि चौथ्या वर्षी पहिली स्पर्धा खेळली. तिने जगज्जेते पद मिळवल्यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. यशाच्या शिखरावर असताना तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. खूप मोठं ऑपरेशन झालं. आता मार्टिना परत खेळणार नाही अशा बातम्या आल्या.... पण ती जिद्दीने परत आली आणि आल्यावर पुन्हा जागतिक स्पर्धा जिंकली...
मार्टिनाचा अख्खा प्रवास वाचल्यावर आणि तिच्या अनेक मॅच पाहिल्यावर माझ्यात एक वेगळाच उत्साह सळसळला. काहीच अशक्य नसतं हे मला तिच्यामुळे जाणवलं. स्वित्झर्लंड सारख्या सुंदर देशात वाढलेल्या मार्टिनाने कमावलेलं यश हे तिथल्या आल्प्स पर्वतासारखे उंच आहे ... खरंच, तिच्याबद्दल समजल्यापासून ती माझी रोल मॉडेल झाली आणि गमतीने का होईना पण माझे कोच मला हिच्या नावाने हाक मारतात या विचाराने खूपच भारी वाटलं.
आता, कधीतरी माझ्या कोचने, तुझा खेळ बघितला तर मार्टिनाला खूप आनंद होईल असे उच्चार काढावेत असं माझं स्वप्न आहे आणि ते मी एक दिवस नक्की पूर्ण करेन!!!
Comments